आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांना यशभीमा-सीना जोडकालव्याच्या सर्वेक्षणाला मान्यता

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांना यश
भीमा-सीना जोडकालव्याच्या सर्वेक्षणाला मान्यता
53 कि.मी. परिसरातील शेतकर्यांना होणार फायदा
सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा सीना जोडकालव्याच्या सर्वेक्षणाला कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी बुधवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच या कामाचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली. आ. सुभाष देशमुख यांनी महायुती सरकारच्या काळात याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता, अखेर त्याला यश आले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने भीमा सीना नदीजोड प्रकल्पास मंजुरी दिली होती. महायुती सरकारने 0.511 टीएमसी पाण्याच्या तरतुदीस मंजुरी दिली होती. आता या प्रकल्पाच्या सर्वेक्षणास कृष्णा खोरे विकास महामंडळाने मान्यता दिली आहे. आता अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्यात येणार असून त्यानंतर त्याचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
पावसाळ्यात वडापूर येथील भीमा नदीतून खालच्या भागात जवळपास 60 ते 100 टीएमसी पाणी वाहून जाते. वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधून हे पाणी बोगद्याद्वारे अकोले मंद्रूप येथे सीना नदीत सोडण्याचे नियोजन आहे. याद्वारे 14.47 दशलक्ष घनमीटर पाणी सीना नदीत येणार आहे. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार असल्याने सिंचनासाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. सीना नदीवरील एकूण 53 किलोमीटर लांबीच्या परिसरातील शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. सीना नदीवरील नंदूर, वडकबाळ, सिंदखेड, बंदलगी, कोर्सेगाव व कुडल येथे कोल्हापूर पध्दतीच्या सहा बंधार्यांत उजनी धरणाचे पाणी उपलब्ध होणार आहे. या जोडकालव्याची लांबी 18 किलोमीटर असून अकोले मंद्रप ते कुडल संगमपर्यंतचे अंतर 35 किलोमीटर आहे.
चौकट
या गावांना होणार फायदा
या वाढीव 0.511 टीएमसी पाण्यामुळे नंदूर, डोणगाव, तेलगाव, अकोले मंद्रूप, गुंजेगाव, पाथरी, वांगी, मनगोळी, वडकबाळ, वांगी, हत्तूर, समशापूर, सिंदखेड, बिरनाळ, चंद्रहाळ, होनमुर्गी, बंदलगी, औराद, राजूर, संजवाड, चिंचोळी, कोर्सेगाव, कुमठा, केगाव, हत्तरसंग, बोळकवठा, कल्लकर्जाळ या गावांत बागायती क्षेत्र वाढणार आहे.
भीमा – सीना नदीजोड प्रकल्पासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने याला मंजुरी दिली. आता सर्वेक्षणाला मान्यता मिळाली आहे. लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण होणार आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्नशील आहे.