solapur

सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे सभासदांना मिळणार ८ टक्के लाभांश

बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे : सोलापूर जनता सहकारी बँकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

 

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सभासदांना ८ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी जाहीर केले. सोलापूर जनता सहकारी बँकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हुतात्मा स्मृती मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

यावेळी व्यासपीठावर सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, संचालक प्राचार्य गजानन धरणे, ॲड. प्रदीपसिंग राजपूत, वरदराज बंग, जगदीश भुतडा, चंद्रिका चौहान, रविंद्र साळे, आनंद कुलकर्णी, सी. ए. गिरीश बोरगावकर, राजेश पवार, पुरुषोत्तम उडता, मुकुंद कुलकर्णी, विनोद कुचेरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉ. अजितकुमार देशपांडे, पेंटप्पा गड्डम, सी. ए. आनंद करवंदे उपस्थित होते.

प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले.
बँकेचे अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये बँकेच्या व्यवसायात ४३ कोटी ९० लाख रुपयांची वाढ होऊन बँकेचा व्यवसाय २ हजार ८२८ कोटी ७३ लाख रुपये इतका झाला आहे. तर २८ कोटी ७८ लाख रुपयांचा निव्वळ नफा बँकेला झाला आहे. जनता बँकेच्या संचालक मंडळाने कर्ज वसुलीसाठी सुनियोजित व कडक धोरण स्वीकारून एनपीएमध्ये चांगली वसूल केली आहे. बँकेचा एनपीए मागील वर्षीच्या तुलनेत ३७ कोटी १ लाखाने कमी झाला आहे. नेट एनपीए २.६० टक्क्यांनी कमी होऊन १.४० टक्के झाला आहे, असेही अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी याप्रसंगी सांगितले.

या सभेमध्ये संचालक मंडळाने तयार केलेल्या आर्थिक वर्ष २०२३ – २४ चा अहवाल व शिफारस केलेल्या आर्थिक वर्षा २०२४ – २५ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच आर्थिक वर्ष २०२३ -२४ च्या नफा विभागणीला मंजूरी, आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये बाहेरून उभारावयाच्या निधीची मर्यादा ठरवणे, वसुलीचे हक्क अबाधित ठेवून संशयित व बुडीत कर्ज खात्यांचे निर्लेखन करणे आदी विषयांवर चर्चा होऊन सभासदांनी विषय मंजूर केले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी केले.
बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी प्रास्ताविक केले. पूनम मोडक यांनी सूत्रसंचालन तर उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button