केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचे प्रसारित झाले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊतांनीही यावर भाष्य केले. अजितदादा हे एकनाथ शिंदेंपेक्षा वरिष्ठ नेते आहेत. अनुभवाच्या आधारावर त्याचे मुख्यमंत्रिपदावर हक्क तर बनतोच. कारण शिंदे यांच्यापेक्षा जास्त बेईमानी अजितदादा यांनीदेखील केली आहे, असे राऊत म्हणाले. त्याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले आहे.
- अजितदादा मुख्यमंत्री होतील की नाही हे पाहू. पण तुम्ही शरद पवारांच्याकडे वाऱ्या करून थकले आहात. तुम्ही पवारांचे दलाल आहात. तुम्ही उद्धव ठाकरे यांचे नाव तरी पुढे जोडा, अशा शब्दात शिरसाटांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अजितदादा यांनी काय केले, काय नाही केले, याकडे राऊतसारख्या बिनडोक माणसाने लक्ष देऊ नये. यांची गत ‘ना घर का ना घाट का’ अशी झालेली आहे. यांना महविकास आघाडीत कुणी महत्व देत नाही, असेही शिरसाट म्हणाले.