प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेचा उत्साहात समारोप…
श्री शिवराज्याभिषेकाने झाली महान हिंदू साम्राज्याची स्थापना...
सोलापूर : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्य निर्माण करुन छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदूंना जुलमी अत्याचारातून मुक्त केले. श्री शिवराज्याभिषेकाने महान हिंदू साम्राज्याची स्थापना झाली, असे प्रतिपादन छत्रपती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी केले.
३५० व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेचा समारोप बुधवारी झाला. यावेळी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी मार्गदर्शन केले. ‘शिवविजय’ या विषयावर बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विजयपर्व, श्री शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्याची स्थापना, भारतव्यापी हिंदवी साम्राज्य आदींवर विवेचन केले.
प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराज राजे असूनही संत वृत्तीचे होते. विशाल दृष्टिकोन, सहकाऱ्यांना प्रेरणा, त्यागमय जीवन असेल तर महान कार्य घडते. श्री शिव छत्रपतींच्या या गुणांची किर्ती पाहूनच छत्रसाल बुंदेला यांच्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळाली. रामायण, महाभारत यांतील संपूर्ण सार श्री शिवचरित्रात आहे, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले.
सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी प्रास्ताविक तर गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
———-
उत्तम सेना असेल तर राष्ट्राची विजयाकडे घोडदौड
ज्या राष्ट्राची सेना उत्तम असेल आणि सेनेचे नेतृत्वही उत्तम असेल ते राष्ट्र विजयाकडे घोडदौड करते. आपल्या भारताच्या अत्यंत शूर सेनादलांमुळे भारताची मान जगात आणखी उंचावली आहे, अशा शब्दांत प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी तीनही सैन्यदलांचे कौतुक केले.
——
कथेच्या समारोपप्रसंगी आमिर तडवळकर यांच्या समर्पित नाट्य शाळेच्या कलाकारांनी श्री शिवराज्याभिषेकाचा प्रसंग हुबेहूब सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या सादरीकरणातील श्री शिवछत्रपती शिवभक्तांमधून व्यासपीठावर येताना शिवभक्तांनी फुलांची उधळण करीत छत्रपती श्री शिवरायांचे स्वागत केले. धर्मवीर चित्रपटातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका करणारे मकरंद पाध्ये यांनी छत्रपती श्री शिवाजी
महाराजांची भूमिका साकारली.