मला समजलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भाग – २*
मला समजलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भाग – २*
*आपण सारे हिंदू आहोत*
आपल्या देशातील रूढी-परंपरा जपणारा, संस्कृती पाळणारा प्रत्येक जण हिंदूच आहे, कारण या भूमीमधल्या सर्व प्रकारच्या जीवनपद्धतीचा अंगीकार करणारा व्यक्ती हिंदूच असू शकतो. त्यामुळेच आपण सारे खऱ्या अर्थाने हिंदूच आहोत.
भारतामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक गोष्टी बदलत गेल्या. दुर्दैवाने वर्णपरंपरा दृढ झाली व यातूनच जाती – पोटजातींचा जन्म झाला. कदाचित काळाची गरज म्हणून – व्यवस्था म्हणून या गोष्टी आल्या असतील, परंतु आजच्या काळात मात्र जाती – पोटजातींमुळे धर्म विभागला गेला आहे. जाती – पोटजातींप्रमाणेच काही उपासना पद्धती व भक्तीचे वेगळे मार्ग चोखाळणारे संप्रदाय यांची देखील निर्मिती झाली. उपासना पद्धती, संप्रदाय हे हिंदू धर्माचे घटक आहेत, परंतु पुढे अभिमान जागृत होऊन यातील काही संप्रदाय व उपासना पद्धतीने स्वतंत्र धर्माचे स्वरूप घेतले. परकीय आक्रमणाच्या निमित्ताने येथे काही अहिंदू लोकही आले, येथेच राहिले, अनेक पिढ्या येथेच त्यांनी वास्तव्य केले. सहिष्णू असणाऱ्या हिंदू समाजाने या लोकांना स्वीकारले. या लोकांनी देखील येथील रुढी – परंपरा व संस्कृतींचा अंगीकार केला, त्यामुळे ते या भूमीचे घटक झाले म्हणूनच या भारत भूमीमध्ये असणाऱ्या प्रत्येकाने सनातन हिंदू धर्म जीवन पद्धतीचा अंगीकार केला आहे. अस्पृश्यता अथवा अन्य चुकीच्या गोष्टींमुळे धर्माबद्दल प्रेम अथवा श्रद्धा राहिली नाही, त्यामुळेच अलीकडच्या काळात जाती – पोटजाती, उपासना पद्धती, संप्रदाय, विदेशातून आलेल्या अहिंदू लोकांचे धर्म या साऱ्यांनीच आपण स्वतंत्र आहोत, आपण निराळे आहोत हा पवित्रा घेतला आहे. परंतु वास्तव जर विचारात घेतले तर आपण सारेच हिंदू आहोत.
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र.७५८८२१६५२६