socialmaharashtrasolapur
हिंदू म्हणविणारा मार खाऊ लागला
मला समजलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भाग – ३*
*हिंदू म्हणविणारा मार खाऊ लागला*
भारतावर इंग्रजांचे राज्य आले. हे राज्य आपल्या लोकांच्या एकीच्या अभावातून आले होते व अनेक वर्षे इंग्रजांचे राज्य टिकले देखील आपल्यातील एकीच्या अभावामुळेच. आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन इंग्रजांनी अनेक धूर्त चाली केल्या व या धूर्त चालींना आम्ही बळी पडत गेलो. आमच्या जाती-जातींमध्ये भांडणे लावली गेली, हिंदू व मुसलमान हे वेगळे आहेत हे सातत्याने पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदू व मुसलमान यांच्यात एकी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने इंग्रजांनी कुटील डाव रचले, याचा परिणाम म्हणून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवातीच्या काळामध्ये गती मिळू शकली नाही.
हिंदू म्हणविणारे जाती – पोटजातींमध्ये विभागले गेले व आपल्या – आपल्यामध्येच क्षुल्लक कारणावरून भांडू लागले. आपल्यातच भांडणं लागल्यामुळे आपण एक होऊन इंग्रजांशी लढू शकलो नाही. त्यातच हिंदू धर्म जाती – पोटजातीमध्ये विभागला गेल्यामुळे हिंदू धर्माबद्दल कोणालाच आत्मीयता राहिली नाही. याचा परिणाम इंग्रज देखील हिंदूंना जमेस धरत नव्हते. उलट मुस्लिम समुदायाला त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला, त्यातच भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत नेतृत्व करणारे हिंदू असणारे नेतेदेखील हिंदू या शब्दाची ऍलर्जी असल्याप्रमाणे वागू लागले. त्यामुळे आम्ही हिंदू आहोत असे म्हणविणारे प्रत्येक ठिकाणी मार खाऊ लागले.
एक वेळ गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका अशी भावना बळावत चालली. अशी भावना बळवणे हे येथील धर्म – संस्कृतीच्या व देशाच्या भविष्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. ही धोक्याची घंटा काही जणांना ऐकू आली व त्यांनी हिंदू समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना काहीअंशी यश लाभले, परंतु इतिहासाचा आढावा घेतल्यास अठराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत या भूमीमध्ये आम्ही हिंदू आहोत म्हणविणाऱ्यांनी दुर्दैवाने मारच खाल्ला आहे.
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र.७५८८२१६५२६